बातमीचा धसका घेताच जुगाराचा डाव आवरला? नव्या जागेच्या शोधात जुगारचालक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा…पाठबळ कोणाचे? ‘सेटिंग’ लावणारा तो शेठ कोण, याचीही परिसरात कुजबुज…पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष; जुगार बंद झाला की केवळ ठिकाण बदलले, असा नागरिकांचा सवाल
संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०३)
खुंटबाव परिसरातील काटेरी झुडपांच्या आड सुरू असल्याच्या चर्चेत असलेल्या जुगार अड्ड्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच जुगाराचा खेळ बंद झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. मात्र, जुगार पूर्णपणे बंद झाला की केवळ ठिकाण बदलण्याची तयारी सुरू आहे, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.
काही दिवसांपासून परिसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अचानक जुगाराचा डाव थांबल्याचे दिसून आल्याने नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच कारवाईची चाहूल लागली का? की जुगारचालकाने काही काळासाठी खेळ बंद करून दुसरी जागा शोधण्याचा मार्ग स्वीकारला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान, जुगाराचा अड्डा चालविण्यासाठी कथितरित्या कोणाचे राजकीय पाठबळ मिळते? संबंधितांना कारवाईपासून वाचविण्यासाठी ‘सेटिंग’ लावणारा तो नेमका कोण? या चर्चेलाही परिसरात उधाण आले आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जुगारामुळे तरुण वर्ग आणि कुटुंबांवर होणारे आर्थिक व सामाजिक परिणाम लक्षात घेता पोलिसांनी केवळ एका ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा अशा प्रकारच्या अड्ड्यांचे जाळे शोधून काढणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे, एखाद्या ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत असेल आणि वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच तो अचानक बंद होत असेल, तर असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून जुगार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
आता जुगाराचा खेळ खरोखरच बंद झाला आहे की फक्त ठिकाण बदलून पुन्हा सुरू करण्याची तयारी आहे, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. तसेच ‘सेटिंग’ आणि कथित राजकीय पाठबळाच्या चर्चेत तथ्य आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे.
“वृत्त प्रसिद्ध होताच खेळ बंद; मग आधी माहिती नव्हती का?”
जुगार अड्ड्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अचानक खेळ बंद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी करून जुगाराचे ठिकाण, आयोजक आणि त्यामागील संभाव्य आर्थिक व्यवहार यांची माहिती तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जुगार बंद झाला की फक्त अड्ड्याचे ठिकाण बदलले? याचे उत्तर कारवाईतून मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुख्य संपादक:





















