संघर्ष नायक वृत्तसेवा पाटस ता.०१
यवत पोलीस स्टेशन येथे जमा झालेल्या बेवारस वाहनांच्या विल्हेवाटीसाठी ६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव पाटस पोलीस दुरक्षेत्र येथील आवारात होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
मा. तहसीलदार, दौंड यांच्या आदेशानुसार (क्र. फौजदारी/कावि/१०२/२०२६, दि. २४ फेब्रुवारी २०२६) हा लिलाव पार पडणार असून, संबंधित प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. या लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्क्रॅप व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करणे बंधनकारक आहे.
लिलावात भाग घेण्यासाठी स्क्रॅप परवान्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, अर्ज तसेच १ लाख रुपयांची अनामत रक्कम (डिमांड ड्राफ्ट स्वरूपात) सादर करावी लागणार आहे. हा डिमांड ड्राफ्ट “पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन” यांच्या नावे असावा. संबंधित अर्ज जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून दोन दिवसांच्या आत यवत पोलीस स्टेशन येथे जमा करणे आवश्यक आहे.
या संदर्भात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्क्रॅप व्यावसायिकांना लिलावात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेद्वारे पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांची नियमानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे.

मुख्य संपादक:
























