यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०५)
बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरीपार्धी (ता.दौंड) च्या हद्दीत दोघांना अटक केली. या कारवाईत एकूण ४१ किलो १८ ग्रॅम गांजा आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार असा सुमारे २५ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीत सुपा–केडगाव चौफुला रोडवरील दत्त मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. हर्षवर्धन अशोक बरडे (वय २९, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय ३०, सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.आरोपींच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडी क्रं एमएच १२ डब्ल्यूएक्स ६५०५ यां पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. तपासणीदरम्यान दोन स्वतंत्र पोत्यांमध्ये प्लास्टिकच्या पट्टीने गुंडाळलेली बंडले आढळून आली. त्यामध्ये हिरवट-काळसर रंगाचा बियाबोंडे व भुगा असलेला गांजा आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पहिल्या पोत्यातून २० किलो ५०० ग्रॅम आणि दुसऱ्या पोत्यातून २० किलो ५१८ ग्रॅम, असा एकूण ४१ किलो १८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत २० लाख ५० हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय सुमारे ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी आणि वाहतूक केल्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक नोंदीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गांजाची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा आरोप आहे.या प्रकरनी पोलीस हवालदार विकास कापरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे हे करीत आहेत.

मुख्य संपादक:


















