लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची नागरिकांत चर्चा; पारगाव, केडगाव, एकेरेवाडी परिसरातूनही येतात जुगारी? कुणाच्या वरदहस्ताने चालवला जात आहे लाखोंचा जुगार, याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा आहे.
यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.२८)
खुंटबाव परिसरातील काटेरी झुडपांच्या आडोशाला मोठ्या प्रमाणावर जुगाराचा अड्डा सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे. या ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल असलेला जुगार खेळला जात असल्याचा दावा काही नागरिकांकडून केला जात असून, पारगाव, केडगाव, एकेरेवाडीसह परिसरातील विविध गावांतून लोक जुगार खेळण्यासाठी येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत असलेल्या या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काटेरी झुडपांचा आडोसा, निर्जन परिसर आणि त्यातून सुरू असलेली कथित जुगाराची मैफल यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दिवसभराच्या कमाईतील पैसे गमावण्यापासून कुटुंबातील आर्थिक परिस्थिती उद्ध्वस्त होण्यापर्यंत जुगाराचे गंभीर परिणाम होत असताना, अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, खुंटबाव परिसरात बाहेरील गावांमधूनही जुगार खेळण्यासाठी लोक येत असल्याची चर्चा असल्याने या कथित अड्ड्याचे जाळे नेमके किती दूरपर्यंत पसरले आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे. जर हा प्रकार प्रत्यक्षात सुरू असेल, तर तो कोणाच्या संरक्षणाखाली किंवा कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे? असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते; मात्र खुंटबाव परिसरातील या कथित जुगार अड्ड्याबाबत नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे स्थानिक पातळीवरील पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारवाईची नागरिकांची मागणी
खुंटबाव परिसरातील कथित जुगार अड्ड्याची पोलिस प्रशासनाने गोपनीय पद्धतीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, जुगार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकारामागे कोणाचे आर्थिक अथवा अन्य स्वरूपाचे पाठबळ आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

मुख्य संपादक:
























