यवत संघर्ष नायक प्रतिनिधी दि . ३०
दौंड तालुक्यातील बोरीएंदी येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल देविदास दीक्षित यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फिल्म मेकिंग, ॲनिमेशन आणि AI कंटेन्ट क्रिएशनच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या निखिल यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने उरुळी कांचन येथे D2D ऍनिमेशन नावाने AI आणि ॲनिमेशन इन्स्टिट्यूट तसेच प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
निखिल दीक्षित यांचे प्राथमिक शिक्षण बोरीएंदी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवराम बापू कुदळे बोरिएंदी येथील विद्यालयात, तर अकरावी-बारावीचे शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे झाले. त्यानंतर पुणे येथील थम्बनेल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी फिल्म मेकिंग व ॲनिमेशनचे प्रशिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात सातत्याने काम करत आपले कौशल्य विकसित केले.

‘लिटल सिंघम’, ‘गोलमाल ज्युनियर’, ‘छोटा भीम’वर काम
लहान मुलांच्यात आवडीचे व टीव्ही आणि मोबाईलवर लोकप्रिय असलेल्या विविध कार्टून मालिकांच्या निर्मितीमध्ये निखिल यांनी काम केले आहे. ‘लिटल सिंघम’, ‘गोलमाल ज्युनियर’ आणि ‘छोटा भीम’ यांसारख्या लोकप्रिय कार्टून मालिकांवर त्यांनी काम केले आहे. विशेषतः ‘लिटल सिंघम’च्या ॲनिमेशनच्या तब्बल साडेसातशे भागांपर्यंत त्यांनी स्वतः काम केले असून, या मालिकेचे काम अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शहरातील सुविधा गावात
कोरोना काळानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार निखिल यांच्या मनात आला. AI, ॲनिमेशन, फिल्म मेकिंग आणि डिजिटल कंटेन्ट क्रिएशनसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत असताना ग्रामीण विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील शिक्षणासाठी पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांकडे जावे लागू नये, यासाठी त्यांनी उरुळी कांचन येथे स्वतःचे इन्स्टिट्यूट सुरू केले.
सध्या युवा पिढीमध्ये AI कंटेन्ट क्रिएशन हा नवीन आणि वेगाने विकसित होणारा ट्रेंड आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांना व्यावसायिक पातळीवर तयार करण्याचे काम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केले जात आहे. यासोबतच उरुळी कांचन येथे प्रोडक्शन हाऊसदेखील सुरू करण्यात आले आहे.
सध्या ४५ विद्यार्थ्यांची बॅच…
या इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुमारे ४५ मुला-मुलींची बॅच सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना AI, ॲनिमेशन, फिल्म मेकिंग आणि कंटेन्ट क्रिएशनची, ऍनिमेशन व्हीएफएक्स, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स डिझाईनिंग, AI लाईव्ह फिल्म मेकिंग,व्यावहारिक माहिती देऊन त्यांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधींसाठी सक्षम करण्याचा निखिल यांचा प्रयत्न आहे.या संपूर्ण उपक्रमात निखिल यांची पत्नी तनुजा दीक्षित यांचीही त्यांना मोलाची साथ मिळत आहे. इन्स्टिट्यूटच्या कामकाजात त्या सक्रियपणे मदत करतात.
– निखिल दीक्षित (इन्स्टिटयूट चालक)
वडिलांचा भावाचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय
निखिल यांचे वडील आणि लहान भाऊ हे दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करतात. आजही त्यांचा छोटा भाऊ वडिलांसोबत दुचाकी दुरुस्तीच्या व्यवसायात काम करत आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या निखिल यांनी मात्र आपल्या मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या जगाशी जोडण्याचा निखिल दीक्षित यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांच्या या उपक्रमातून अनेक ग्रामीण तरुणांना AI आणि ॲनिमेशनच्या क्षेत्रात करिअरची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

























