यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (ता.०९)
केडगाव ता. दौंड येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात यवत पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची व्याप्ती वाढवत मोठी कारवाई केली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची पत्नी राणी अण्णासाहेब गिरी हिचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिला ८ सप्टेंबर रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता तिला ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व इतर संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सखोल व तांत्रिक पद्धतीने करण्यात येत आहे.
तपासादरम्यान ८ सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्या राहत्या घरी करण्यात आलेल्या तपासातून त्याची पत्नी राणी गिरी हिचाही कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तसेच या माध्यमातून मिळणारी रक्कम तिच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा होत असल्याचे, तसेच अन्य आरोपींच्या बँक खात्यांमधूनही संबंधित आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले डॉ. सुमंत तुकाराम शितोळे, बापूराव जांभळे आणि सचिन कदम यांनी बारामती येथील माननीय सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. सुनावणीदरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध उपलब्ध असलेले कथित सबळ व तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर मांडले.प्रकरणाचे गांभीर्य, तपासातील पुरावे आणि तपासी अधिकाऱ्यांचा युक्तिवाद विचारात घेत बारामती सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले, अशी माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
फरार डॉ.मंदार माळी याचाही अटकपूर्व जामीन नामंजूर..
या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी डॉ. मंदार सुरेश माळी याने अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी बारामती सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळून लावला आहे.या कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, आर्थिक व्यवहार, आरोपींची परस्पर भूमिका तसेच गुन्ह्याशी संबंधित अन्य बाबींचा SITकडून सखोल तपास सुरू आहे. प्रकरणातील पुढील तपास विधिग्राह्य पुराव्यांच्या आधारे करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्य संपादक:
























