यवत संघर्ष नायक वृत्तसेवा (दि.०८)
शेतात काम करून झाडाजवळ बसलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला ‘मावशी, साप आला!’ असे सांगून घाबरवून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी अल्पावधीत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण सुमारे ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही घटना ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता दापोडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक ५९ मधील शेतजमिनीत घडली. फिर्यादी सौ. सुनंदा बापू रूपनवर (वय ६५) या ऊस पिकाची लागवड करून शेतातील झाडाजवळ बसल्या होत्या.
यावेळी आरोपी सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे (वय १९, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे) याच्यासह दोन अनोळखी साथीदार मोटारसायकलवरून शेतात आले. त्यापैकी दोघांनी महिलेच्या जवळ जाऊन ‘मावशी, साप आला!’ असे मोठ्याने सांगत त्यांना घाबरवले. घाबरलेल्या रूपनवर या तेथून पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून गळ्यातील सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना यवत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. अल्पावधीतच पोलिसांनी सुमित उर्फ घा-या साळुंखे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले अंदाजे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत सुमारे ६५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल, किंमत सुमारे ३० हजार रुपये, असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यातील उर्वरित दोन अनोळखी आरोपींचा शोध सुरू असून, त्याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे. चोरीस गेलेले दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिलेने यवत पोलिसांचे आभार मानले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर यांच्यासह पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करीत आहेत.

मुख्य संपादक:
























