संघर्ष नायक वृत्तसेवा पारगाव (ता.१७)
दौंड तालुक्यातील पारगाव येथील मंडल कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पारगाव, खोपोडी, गलांडवाडी, देलवडी, पिंपळगाव या पाच गावांसाठी आज श्री तुकाईदेवी मंदिर परिसरात ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या अडचणी व तक्रारी थेट त्यांच्या गावात जाऊन सोडवणे हा आहे. विविध शासकीय विभाग एकत्र येऊन एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या शिबिरात उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांसाठी अर्ज, आधार व इतर कागदपत्रे अद्ययावत करणे अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि वारंवार सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचला.
अधिकाऱ्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण केले. अनेक प्रकरणांमध्ये जागेवरच मंजुरी देण्यात आली. यामुळे शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व विश्वास वाढीस लागल्याचे दिसून आले.
दिवसभर चाललेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी अर्ज सादर केले. त्यापैकी अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दौंडचे उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार तुषार बोरकर, ममता भंडारी, सर्व सर्कल अधिकारी, ग्राम वसुली अधिकारी, कृषी विभाग, पंचायत समिती कर्मचारी तसेच प्रांत व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या डॉ गायत्री खळदकर व पंचायत समिती सदस्या मनीषा ताकवणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
एकूणच, ‘सरकार तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नागरिकांच्या समस्या जलद, सोप्या आणि एकाच ठिकाणी सोडवण्याचा हा प्रभावी उपक्रम ठरला.
या कार्यक्रमासाठी पारगाव मंडल अधिकारी श्रीकृष्ण सिरसाठ, ग्राम वसुली अधिकारी विपुल पाटील, रामकृष्ण वेताळ,कोतवाल चांदभाई पठाण, बाळासो चव्हाण यांनी श्रम घेतले.

मुख्य संपादक:
























